तणावमुक्त शिक्षणशैली: काळाची गरज
दि. ५ जानेवारी 2022 रोजी झील इंटरनॅशनल स्कूल, बामनोळी, सांगली येथे शिक्षकांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट मा. डॉ. श्री कालिदास पाटील साहेब यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी मिरज तालुक्याचे तहसीलदार मा. श्री डी. एस. कुंभार साहेब व झील इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर मा. श्री संजय महाडिक सरांनी प्रमुख उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला मा. श्री डी. एस. कुंभार साहेबांनी साहेबांनी अगदी कमी शब्दात शिक्षकांची जबाबदारी व कर्तव्य याबाबत ऊहापोह केला. नंतर प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. श्री कालिदास पाटील साहेबांनी शिक्षकांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते म्हणाले, संस्कार म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? हे समजावून घेऊन विद्यार्थ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करणारा खरा शिक्षक होय. विद्यार्थ्याला फक्त वाढवायचं की घडवायचं हे शिक्षकांनी ठरवणे आवश्यक आहे. शाळेतील दिसणार्या आणि प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी शिक्षकांनी शिकवताना ‘अन्नमय कोश’, ‘प्राणमय कोष’, ‘मनोमय कोश’, ‘विज्ञानमय कोश’ व ‘आनंदमय कोश’ या 5 कोशांद्वारे कसे शिक्षण देता येईल याचे महत्त्व सांगितले. मी कोण आहे? कसा आहे? आणि कसा असायला हवा? याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे.
एक मूल हे एक विद्यापीठ असू शकत, असे संबोधून आधुनिक शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्या आवडीनिवडी मध्ये आपली योग्य भूमिका निभावणारा आदर्श शिक्षक बनू शकतो हे त्यांनी अनेक उदाहरणासह स्पष्ट केले. शिक्षण देताना शिक्षकाने त्यातून स्वतःला आनंद घेऊन विद्यार्थ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने शिक्षक तणावापासून दूर राहून उत्तम कामगिरी बजावू शकतो.
तनावमुक्त शिक्षणशैलीच्या वार्तालापामध्ये मा. श्री संजय महाडिक सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘मीच बरोबर आहे’ असे न म्हणता, ‘जे करतो ते बरोबर आहे का?’ याचा विचार करण्याची गरज आहे. अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी तन-मन-धन अर्पण करून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आभार ॲॅकॅडेमिक कोऑर्डिनेटर सौ. मेघाली नरगच्चे मॅडम यांनी मानले तर सूत्रसंचालन अभय भिलवडे सर व फेबी मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी झील इन्स्टिट्यूटचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री विजय गीते सर, स्कूलचे प्रिन्सिपल श्रीमती अल्फोन्सो लॉरेन्स मॅडम व ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल श्री संदीप पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.